आपल्याला एखादी गोष्ट खरेदी करायची आहे म्हटल्यावर सर्वांत आधी त्या गोष्टीची गरज बघतो. त्यानंतर तिला लागणारा खर्च बघतो. तो आपल्या बजेटात असला तरच आपण ती वस्तू किंवा गोष्ट घेतो. बरोबर?
या धावपळीच्या युगात एक क्षण मित्रांसोबतचा तुमच्या सर्व ताणाला कमी करु शकतो. शिवाय तुमच्या बुद्धीला चालना देतो. काही दिवसांपूर्वी हव्या त्या गोष्टी कशा मिळवायच्या या विषयावर सर्व मित्रात चर्चा सुरू होती. सगळ्यांची वेगवेगळी मतं होती, विशेष म्हणजे सर्व जण वर्किंग होती. बऱ्याच जणांचं म्हणणं होत, की कर्ज घेतल्यामुळे आयुष्याची दूर्दशा होते.
तर बोटांवर मोजण्या इतक्या मित्रांचं म्हणणं होत, की कर्जाने सर्व गोष्टी चुटकीसरशी सुटू शकतात. पण, त्यांची संख्या कमी असल्याने त्या सर्वांचा आवाज दबला होता. त्यात मीही होतोच. मग मी म्हटलं कसं ते सांगा? तर त्यातला एक जण म्हटला त्यांचं व्याज जास्त असतं. मग मी म्हटलो व्याज तर असणारच, तुम्हाला एवढी रक्कम वापरायला मिळणार आहे. दुसरा म्हणाला मग घ्यायचंच कशाला? मग मी थेट मुद्द्यावरच आलो. चला तुम्हाला सांगतो कर्ज घेणं योग्य की अयोग्य…
कर्ज घेताय? या गोष्टीचा विचार केला?
कर्ज आपण कशासाठी घेतोय, का घेतोय, आपण ते फेडू शकू का? हे काही मोजके प्रश्न आहेत. जे कर्ज घ्यायच्या आधी आपण स्वत: ला विचारले पाहिजे. कारण, कर्ज घेणं हे एक कौशल्य आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. तुम्हाला जर याचा अर्थ समजला असेल तर कर्जामुळे खूप चांगल्या गोष्टी आपण सहज करु शकतो. यासाठी एक उदा. आपण समजून घेऊया. आपल्याला एखादी गोष्ट खरेदी करायची आहे म्हटल्यावर सर्वांत आधी तिची गरज बघतो. त्यानंतर तिला लागणारा खर्च बघतो. तो आपल्या बजेटात असला तरच आपण ती वस्तू किंवा गोष्ट घेतो. बरोबर? कर्ज घेताना याच गोष्टी आपल्याला अनुसरायच्या आहेत. हा मूलभूत पाया झाला. मात्र, खरी गोष्ट पुढे आहे.
कर्ज घेणं योग्य की अयोग्य?
मी पहिलेच स्पष्ट करतो की कर्ज घेणं चांगलं आहे. त्याची दुसरी बाजू ही आपण पाहणार आहोतच. पण, पहिली ही पाहून घेऊ. समजा आपल्याला घर घ्यायचं आहे. ते घर आपल्याला सहजासहजी घेता येणार नाही. कारण, त्याची किंमत लाखात राहणार आहे. पण, तु्म्ही तुमचा बजेट सेट केला आणि त्यानुसार अंमलबजावणी केली तर ते शक्य होऊ शकतं. तसेच, तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे आणि मुलाला शिक्षणासाठी परदेशी पाठवायचे आहे, या गोष्टीसाठी देखील तुम्हाला बराच खर्च लागणार आहे. विशेष, म्हणजे आपण हे एकठोक रक्कम देऊन करुच शकणार नाही आहोत. काही जण अपवाद असतील. मात्र, काहींना शक्य होणार नाही आहे.
या गोष्टींच्या कर्जासाठी आपल्याजवळ नियोजन असणं गरजेचे आहे. तुमचा पगार, खर्च, बचत आणि गुंतवणूक या सर्वांची सांगड घालून तुम्हाला यात उडी घ्यायची आहे. तरच तुम्ही सहज कर्ज फेडू शकणार आहात. हे कर्ज तुमच्या आयुष्याला खरंच भरारी देणारं ठरणार आहेत. यात दुमत नाही. कारण, या गोष्टीतून तुम्हाला काहीतरी ठोस घडवता येणार आहे, तुमच्या उत्पन्नाचा काही भाग वाढणार आहे. म्हणून या कर्जांना आपण योग्य कर्ज म्हणू शकतो.
…म्हणून कर्ज अयोग्य वाटतात
पण, याच्या उलट तुम्ही गरज नसताना, विना बजेट आणि विना नियोजन एकाच वेळी दोन-तीन कर्ज घेऊन ठेवले असेल तर मग तुम्हाला हे सगळं अवघड होणार आहे. शिवाय तुमच्या बजेटपेक्षा जास्त कर्ज तुम्ही घेणार असाल तर याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर देखील परिणाम होणार आहे. तसेच, जर तुम्ही क्रेडिट कार्डवरुन काही घेतलं असेल, त्याचा एखादा हप्ता थकला असेल तर मग विषयच नाही. म्हणजे त्याचे व्याज अधिक असते, ते तुम्हाला फेडताना नक्कीच नाकी नऊ येणार. या सर्व गोष्टी विचारात घेतल्या तर लक्षात येईल, इथे कोणतेच नियोजन नाही. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही कर्ज घेत असाल तर तुमच्यावर व्याजाचा बोजा वाढणार आणि म्हणून कर्ज घेणं तुम्हाला अयोग्य वाटत. काय म्हणता?
कर्ज घेण्याचे फायदे..
तु्म्ही जर नियोजन करुन कर्ज घेणार असाल तर तुम्हाला करात सवलत मिळू शकते. शिवाय तुम्ही ज्या ठिकाणावरुन किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतले आणि नियमित हप्ते भरले तर तुम्हाला ती संस्था आणखी वाढवून कर्जाची रक्कम देऊ शकते. तुम्हाला खरंच एखादी वस्तू घ्यायची असेल आणि ती नो काॅस्ट इमआयवर मिळत असेल तर ती घेऊन तुम्ही व्याज वाचवू शकता. तसेच, कर्ज घेण्याआधी व्याजदरांवर थोडा रिसर्च केला तर आणखी फायदा होऊ शकतो. म्हणजेच जिथे व्याजदर कमी आहे, अशाच ठिकाणावरुन तुम्ही कर्ज घेऊ शकतो. मग आता तुम्हीच सांगा कर्ज घेणं योग्य आहे की अयोग्य…