विमा काढायचा आहे? मग या गोष्टी माहिती हव्या
विमा

विमा काढायचा आहे? मग या गोष्टी माहिती हव्या

Oct 2, 2024

माणसासोबत कधी काय होईल हे सांगता येत नाही. म्हणूनच आर्थिक नियोजनात दुसरी महत्वाची पायरी आहे रिस्क मॅनेजमेंट.  त्यामुळे या गोष्टीसाठी आपल्याला स्वत:च तयार राहावं लागते. यासाठी आपली मदत विमा करते. होय, कोणतीही गोष्ट असो, जर तुम्ही तिचा आधीच विमा केलेला असेल, तर तुम्ही त्या गोष्टीचा संपूर्ण खर्च मिळवू शकता. म्हणूनच गेल्या काही वर्षात विम्याचे अनेक प्रकार पुढे आले आहेत. पण, विमा काय आहे. हे कित्येकांना अजूनही माहिती नाही. म्हणूनच आज आपण विम्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

विमा आहे का?

आज चार चाकी आणि दोन चाकी गाडी असणारांकडे तुम्हाला गाडीचा विमा सापडेल. पण, त्यांचा स्वत: विमा सापडणार नाही. यामध्ये काही अपवाद असू शकतात. पण, बहुतांश जणांजवळ विमा नसतोच. हेच या सध्याच्या पिढीचं वास्तव आहे. म्हणूनच काही कमी जास्त झालं की त्यांचं संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येत. याला जी गोष्ट कवच देते, थोडक्यात सुरक्षा देते त्यालाच आपण विमा म्हणतो.

हा विमा पाॅलिसीधारक आणि विमा देणारी कंपनी या दोघांत होणारा करार असतो. पण, तो विमा कोणता असतो, त्याचे प्रकार किती आहे. हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. विम्याचे मुख्यता दोन प्रकार आहेत. यामध्ये जनरल विमा आणि आयुर्विमा यांचा समावेश आहे. तसेच विम्याचे अनेक उप-प्रकार पडतात. ते आपण स्टेप-बाय-स्टेप जाणून घेणार आहोत.

लाईफ इन्शुरन्स काय आहे?

लाईफ इन्शुरन्स म्हणजेच आयुर्विमा होय. हा विमा फक्त जीवनाशी संबंधित असतो म्हणून याला जीवन विमाही म्हणतात. जीवन विमा आपण काढल्यास आपल्यानंतर आपल्या कुटुंबीयांना सुरक्षितता प्रदान करतो. म्हणजेच एखाद्या घटनेत जीवन विमा काढणार्‍या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या प्रीमियमनुसार संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाला ठरलेली रक्कम एकठोक देण्यात येते. यामुळे अनेक जण आपल्या पश्चात आपलं कुटुंब सुरक्षित करण्यासाठी लाईफ इन्शुरन्सचा पर्याय निवडतात.

लाईफ इन्शुरन्स प्रकार

लाईफ इन्शुरन्सचे अनेक उप- प्रकार बाजारात आहेत. यामध्ये जीवन विमा, टर्म प्लॅन, मनी बॅक प्लॅन, चिल्ड्रन प्लॅन किंवा युनिट लिंक्ड प्लॅन आणि एन्डॉमेंट योजनेचा समावेश होतो. प्रत्येक योजनेची आपली विशेषता आहे. त्यामुळे घेताना सर्व गोष्टी पाहून घेणं आवश्यक आहे.

जनरल विमा काय आहे?

जनरल विमा म्हणजेच सामान्य विमा होय. हा विमा आपल्याला मृत्यूव्यतिरिक्त अन्य संरक्षण देतो. सामान्य विम्याचा करार हा एक वर्ष आणि जास्तीत जास्त पाच वर्षांचा असू शकतो. याशिवाय आपल्याला सामान्य विमा योजनेचे दरवर्षी नूतनीकरण करणे आवश्यक असते.

सामान्य विमा प्रकार

सामान्य विम्यामध्ये आरोग्य विमा, पर्यटन विमा, गृह विमा, वाहन विमा, मालमत्ता विमा, फायर विमा, कमर्शिअल विमा आणि सागरी विमा यांचा समावेश होतो. या विम्यांचे मुख्य काम म्हणजे समजा तुम्ही एखादा पाच लाखाचा आरोग्य विमा काढला आहे. काही दिवसांनी तुम्हाला एखादा आजार झाला आहे. या आजाराचा जे काही खर्च असेल तो सर्व खर्च या विम्यातून हाॅस्पिटलवाल्यांंना देण्यात येतो. तसेच, वाहन विम्याचे आहे. समजा, वाहनाचे काही नुकसान झाल्यास त्याची सर्व भरपाई विमा कंपनी तुम्हाला देते. फक्त घेण्याआधी विम्यामध्ये कोणत्या गोष्टी कव्हर आहेत, हे पाहूनच विमा घेण्याला प्राधान्य द्या.

विमा काढण्याचे हे आहेत फायदे

विमा फक्त आपल्या संरक्षणासाठी आहे हे तर वास्तव आहेच. मात्र, याशिवाय आपल्याला याचे बरेच फायदे आहे. त्यातला महत्वाचा म्हणजे आपल्या नावावर पाॅलिसी असल्यास आपल्याला कर बचतीचा फायदा मिळतो. तसेच, विमा ही आपल्या भविष्याची आर्थिक तरतूद आहे. त्यामुळे भविष्याची चिंता राहत नाही. याचबरोबर विमा काढल्यास त्याची वार्षिक रक्कम भरणे अपेक्षित असते. यामुळे आपोआप बचत करण्याची सवय लागते.

ही विम्याची महत्वाची माहिती असली तरी प्रत्यक्षात विमा घेताना खूप खबरदारी घ्यावी लागते. मार्केटमध्ये अनेक एजंट विमा पाॅलिसी विकायला असतात. पण, आपल्या गरजेनुसार आणि सोयीनुसार तसेच, विमा घेण्यआधी त्याची सर्व माहिती घेऊन तो काढणं फायद्याचे ठरु शकते. याशिवाय आपण एखाद्या विमा तज्ज्ञाची मदत घेऊन विमा काढल्यास आपल्याला जास्त फायद्याचे ठरु शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *