काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, आपल्याला हवं ते कसं मिळवायचं? या विषयावर सर्व मित्रांमध्ये चर्चा सुरू होती. सगळ्यांची वेगवेगळी मतं होती, विशेष म्हणजे सर्व जण नोकरदार होती. बऱ्याच जणांचं म्हणणं होत, की कर्ज घेतल्यामुळे आयुष्याची दूर्दशा होते. तर बोटांवर मोजण्या इतक्या मित्रांचं म्हणणं होत, की कर्जाने सर्व गोष्टी चुटकीसरशी सुटू शकतात. पण, त्यांची संख्या कमी असल्याने त्या सर्वांचा आवाज दबला होता. त्यात मीही होतोच. मग मी म्हटलं कसं ते सांगा? तर त्यातला एक जण म्हटला त्याचं व्याज जास्त असतं. मग मी म्हटलो व्याज तर असणारच, तुम्हाला एवढी रक्कम वापरायला मिळणार आहे. दुसरा म्हणाला मग घ्यायचंच कशाला?
मग मी थेट मुद्द्यावरच आलो. कर्ज घेण्याआधी आपण का घेतोय, त्याचा फायदा काय, आपण ते फेडू शकू का? या प्रश्नांचा कधी विचार केला. हे काही मोजके प्रश्न आहेत. जे कर्ज घ्यायच्या आधी आपण स्वत: ला विचारले पाहिजे. कारण, कर्ज घेणं हे एक कौशल्य आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. तुम्हाला जर याचा अर्थ समजला असेल तर कर्जामुळे खूप चांगल्या गोष्टी आपण सहज करु शकतो.
यासाठी एक उदा. आपण समजून घेऊया. आपल्याला एखादी गोष्ट खरेदी करायची आहे म्हटल्यावर सर्वांत आधी तिची गरज बघतो. त्यानंतर तिला लागणारा खर्च बघतो. तो आपल्या बजेटमध्ये असेल तरच आपण ती वस्तू किंवा गोष्ट घेतो. बरोबर? कर्ज घेताना याच गोष्टी आपल्याला अनुसरायच्या आहेत. हा मूलभूत पाया झाला. मात्र, खरी गोष्ट पुढे आहे.
कर्ज घेणं योग्य की अयोग्य?
मी पहिलेच स्पष्ट करतो की कर्ज घेणं चांगलं आहे. त्याची दुसरी बाजू ही आपण पाहणार आहोतच. पण, आधी पहिली पाहून घेऊ. जे कर्ज घेतल्याने आपल्याला फायदा होणार आहे. ते कर्ज चांगलं आहे. आता फायदा होणार आहे म्हणजे काय तर जे कर्ज घेतल्याने आपण त्यातून पैसे कमवणार आहोत. या कर्जांना आपणं योग्य कर्ज किंवा चांगलं कर्ज म्हणू शकतो.
आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी आणि माझ्या मित्राने गाडी घ्यायचा प्लॅन केला होता. दोघांनीही कर्जावर गाडी घेतली. मग मी ती गाडी घेऊन, एका कंपनीला लावून टाकली. त्यातून मला काही रक्कम मिळायची. ज्यामुळे मला हप्ता चुकवून, काही रक्कम शिल्लक उरायची.
मी हाच प्लॅन माझ्या मित्रालाही सांगितला होता. मात्र, त्याने त्यावर दुर्लक्ष केलं. स्वत: साठी गाडी वापरली. त्यात काही चुकीच नाही. मात्र, गाडी दिवसभर घरीच राहायची. त्याला स्वत:च्या खिशातून हप्ता भरायला लागायचा. माझ्या गाडीचे हप्ते गाडीनेच चुकवले. एवढचं नाही तर मला त्यातून पैसेही मिळवून दिले.
आता मी जे कर्जाचं दुसरं उदाहरण देणार आहे. त्याने तुम्हाला अजून स्पष्ट होईल. माझा एक मित्र सर्व सोयी-सुविधांनी सज्ज असलेल्या फ्लॅटमध्ये राहत होता. त्याला महिन्याला भाडं २० हजार रूपये द्यायला लागायचं. हे मला माहिती होतं. एका दिवशी आमची भेट झाली. मी त्याला सहज म्हटलं की, एवढं भाडं देण्यापेक्षा असा फ्लॅट बघ जिथे एवढाच ईएमआय असेल. यामुळे तुझं स्वत:चं घर होईल. पैसे असेच भाड्यात जाणार नाही. त्याच्या डोक्यात लगेच प्रकाश पडला. त्याने लगेच घर बघायला सुरूवात केली.
काही दिवसांनंतर त्याला पाहिजे तसंच घर मिळाल. विशेष म्हणजे त्याच्या ईएमआयचा हप्ता सुदैवाने फक्त १८ हजार रुपये आला. आता तुम्हीच सांगा हे कर्ज त्याला फायद्यात गेलं की तोट्यात गेलं?
कर्ज घेणं अयोग्य का?
आता जे म्हणताय की कर्ज घेणं अयोग्य आहे. ते का अयोग्य आहे. हे त्यांना आता समजलं असेल. तर ज्या कर्जातून आपल्याला तोटा होणार आहे. हे आपल्याला ही माहिती आहे. मात्र, भावनीकतेच्या निकषावर आपण ते कर्ज घेतो. त्या कर्जाला आपण अयोग्य कर्ज म्हणू शकतो. कारण, कर्ज घेण्याआधी आपल्याला त्यातून फायदा होणार आहे की तोटा हे आपल्याला पाहावे लागणार आहे. तेव्हाच यात उडी मारणं आपल्यासाठी चांगलं ठरु शकतं.
मात्र, काही जण विना कारण, विना नियोजन एकाच वेळी दोन-तीन कर्ज घेऊन ठेवतात. मग एखादा तरी हप्ता थकीत राहणार, त्याचं व्याज वाढणार. कर्जाचं व्याज अधिक असतं. तुम्ही कोणताच विचार न करता अशा पद्धतीने कर्ज घेत असाल तर तुमच्यावर व्याजाचा बोजा वाढणार. हा वाढता बोजा म्हणजेच कर्ज अयोग्य असण्याला पुष्टी आहे. मात्र, हे असं नाही. आता तुम्हा सर्वांच्या लक्षात आलं असेल.
कर्ज घेण्याचा हा आहे फायदा
तु्म्ही जर योग्य नियोजन करुन कर्ज घेणार असाल तर तुम्हाला कर सवलतही मिळू शकते. शिवाय तुम्ही ज्या ठिकाणावरुन किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतले आणि नियमित हप्ते भरले तर तुम्हाला ती संस्था आणखी वाढवून कर्जाची रक्कम देऊ शकते.
तुम्हाला खरंच एखादी वस्तू घ्यायची असेल आणि ती नो काॅस्ट इमआयवर मिळत असेल तर ती घेऊन तुम्ही व्याज वाचवू शकता. तसेच, घरासाठी, गाडीसाठी कर्ज घेण्याआधी व्याजदरांवर थोडा रिसर्च केला तर आणखी फायदा होऊ शकतो. म्हणजेच जिथे व्याजदर कमी आहे, अशाच ठिकाणावरुन तुम्हाला कर्ज घेता येईल. आता कर्ज योग्य की अयोग्य काय आहे, हे तुम्हाला समजलं असेल अशी आशा आहे.
कर्जाशी संबंधित नवीन ब्लाॅगची अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाॅट्सॲप चॅनेलला फाॅलो करा.